बापू , बघता बघता तुम्ही बांधलेल्या या ‘वास्तु’स पन्नास वर्षे झाली. आयुष्याची महत्वाची वर्षे या वास्तुत कशी गेली ते कळलचं नाही. समाधानाने आणि आनंदाने भरलेली.
हि वास्तु बांधण्याआधी श्री मधुसूदन महाराजांनी तुम्हाला विचारले होते,’काय बापूसाहेब घर बांधताय?’ तुम्ही म्हणालात की,’महाराज पैसे कुठेत घर बांधायला’ तेव्हा मधुसूदन महाराजांनी सांगितले की या वसंतपंचमीला भूमीपुजन करा आम्ही येऊ. आणि घर बांधून झाल्यावर ते स्वतः या वास्तुत येऊन गेले. अशी अनेक सत्पुरूषांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली हि वास्तु नेहमीच चैतन्यमय राहिली.
परवा माझी साठीशांत या वास्तुतच झाली. आणि आठवले ते कित्येकांची साठीशांत, सहस्रचंद्र दर्शनाचे कार्यक्रम याच वास्तुत पार पडले. साखरपुडे, मंगळागौरी अशी कित्येक शुभ कार्ये या वास्तुत पार पडली.
जो जे वांछिल। तो ते लाहो । प्राणिजात ।। असं पसायदान माउलींनी जगासाठी मागितलं, पण हे पसायदान प्रत्यक्ष जगले ते म्हणजे आमचे वडिल श्री. श्रीधर नारायण अगरखेडकर हे. प्रत्येकाच्या भल्याचा विचार करणारे. दारी आलेल्या पांथस्थालाही दोन घास खाऊ घालणारे. कोथरूडच्या चाळीतील एक खोली, धनवट पाटील चाळीतील दोन खोल्या असोत व लक्ष्मी-नारायणमधील चार खोल्या असोत. साऱ्या कशा माणसांनी कायम भरलेल्या. त्यांच्याकडे आलेला प्रत्येक जण सुखासमाधानाने भरून पावलेला.
३० मे १९५५ ला जेव्हा उभयतांचं लग्न झालं तेव्हा बापूंना नोकरी नव्हती. पण ऐन लग्नाच्या दिवशी अगदी मांडवातच इंटरव्हयूचा कॉल आला आणि सोलापूरला 'लक्ष्मीविष्णु मील' मध्ये पहिली नोकरी लागली आणि आमची आई म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मीच्या पावलाने उंबरठा ओलांडून आली. आणि लक्ष्मी आमच्या घरी स्थिरावली ती कायमची. नंतर पुण्यांत किर्लोस्कर ऑइल इंजिनला नोकरी लागल्यावर काही वर्षे मोठ्या भावाकडे एकत्र संसार केला. नंतर एरंडवणा गावठाणांत धनवट पाटील चाळीत स्वतंत्र चूल मांडली. आणि आमची आई जीवावरच्या मोठ्या दुखण्यातून वाचली. पुढे पटवर्धन बागेत बंगला बांधला तो सर्व अगरखेडकर कुटुंबीयांमध्ये सर्वांत प्रथम. त्या चार खोल्यांमधील दोन खोल्या धाकट्या भावास अन भाच्यास व्यवसायासाठी दिल्या. तिथे त्यांचा व्यवसाय सुरु झाला आणि नावारूपाला आला.
याच घरात आम्हां भावंडांचं शिक्षण नोकरी, व्यवसाय लग्न इ. पार पडलं. या वास्तूने अनेक शुभ प्रसंग साजरे केले. अगदी साखरपुडे, मंगळागौरी, डोहाळजेवण ते साठीशांती आणि सहस्रचंद्र दर्शन. इथेच भाऊ महाराज देशपांडेंचा भागवत सप्ताहही पार पडला.
हे घर तर आमचा अभिमान आहे. या घरात सारं बालपण गेलं आणि आता शेवटचा श्र्वासही या वास्तुतच जाईल हे नक्की.
शुभम् वास्तु
‘लक्ष्मी-नारायण’ कृपेने झालासे आज
‘लक्ष्मी-नारायण’ वास्तुस वर्षे पन्नास
या वास्तुने दिधलासे अनेका विसावा
उदरनिर्वाहाचा दिधला आसरा
येथेच जाहले अनेकांचे कार्य मंगल
येथेच केला बालगोपाळांनी दंगा
या वास्तुत घ्यावा शेवटचा श्वास
हिच त्या ‘लक्ष्मी-नारायण’चरणी प्रार्थना
माझा परिचय
मी कोण म्हणून काय पूसता
पूसा या वास्तुस माझा परिचय काय असे
या अंगणीच्या आम्रवृक्षास विचारा माझे नाम
सांगेल तो तुम्हा सळसळवून आपले प्रत्येक पान
या वास्तुच्या परसदारी असती नारळीपोफळी
त्या तरूंच्या बसून टोकावर करतील खारुताई माझ्याच नावाचा जागर
या वास्तुच्या हवेत विरघळलासे माझा श्र्वास
जर कधी न राहिला माझा श्र्वास
तरी राहिल येथे माझा आत्मा करून कायमचा वास
… सुनील
अंगणी लावला आहे जो तुम्ही पारिजात
सुगंध तयाचा आहे अजून दरवळत
अंगणी लावला आहे जो तुम्ही आम्रवृक्ष
तयाचा झाला आहे आता वटवृक्ष
परसदारी लाविले जे नारळी पोफळी
श्रींच्या पूजनी येई कामी घरोघरी
ऐसी बांधली जी श्रीवास्तु तुम्ही
देई सर्वांसी ती आनंदाची पर्वणी
येथे नित्य जमलासे आप्तांचा मेळा
येथे नित्य होतसे बालगोपाळांचा खेळा
तुमच्याविणा आता ही वास्तु वाटतसे सुनी सुनी
तुमच्या आठवांचा येतसे उमाळा माझिया मनी
आठवण्यासाठी आधी विसरले तर पाहिजे
विसरण्यासाठी आधी आठवले तर पाहिजे
तुमच्या आठवात गुंग ते तुमचे लेकरू
….सुनील
ति. बापू…..
तुमच्या हातचा सकाळचा वाफाळलेला चहा आता मिळत नाही. पण असं वाटतं तुम्ही हाक मारालं सुनील सहा वाजले ऊठ, दूपारच्या १२.३० च्या ठोक्याला आत्ता हाक येईल वाढलयं सुनील जेवायला ये. दूपारच्या साजेतीनच्या चहालाही तसेचं. रात्री स्वामी समर्थ संपायच्या आत जेवणाची घाई सुरू होतं होती. आता रात्री जेवायची इच्छाच होत नाही.
सकाळी ऊठल्यापासून झोपेपर्यंत तुमच्याशिवाय दिवस जात नाही. सकाळ/संध्याकाळ विष्णु सहस्रनाम आणि नरसिंह सहस्रनाम कानांवर पडत होतं आणि नकळत आमच्याकडूनही म्हटलं जात होतं. आता त्यात खंड पडला . आमच्या नकळत आमच्या दिनचर्येला एक शिस्त लागली होती. प्रत्यक गोष्ट नित्यनियमाने आणि सातत्याने वेळच्या वेळी होत होती.
तुम्ही नोकरीत असतानांही जेव्हा चाळीत रहात होतो तेव्हाही ऑफिसला जाण्या-येण्याची एक निश्र्चित वेळ होती. चाळकरिही नेहमी म्हणायचे बापू आले म्हणजे सायंकाळचे पाच वाजले घड्याळ लावून घ्या.
तुमच्या येण्याची आणि चहा पिऊन झाल्यावर तुमच्याकडून गोष्टी ऐकण्याची नित्य सवय आमच्याबरोबर चाळीतल्या सर्व मुलांनाही लागली होती. आमचे वाढदिवस साजरे केलेत . मटकीची ऊसळ अन् ब्रेड अन् फ्रुटसॅलेट करणे हे फक्त तुम्हालाच जमायचं. आम्हा मुलांना न मागताच सारं काही मिळायचे. तुम्ही मुंबईवरून आणलेलं हार्मोनियम आणि खेळण्यातली रेल्वे अगदी बंगल्यात राहिल्यावर आल्यावर सुद्धा तशीच होती. तुम्ही आणलेली रांगणारी बाळंही अगदी पकादादाची पल्लवीला सुद्धा खेळायला मिळाली.
तुम्ही आणलेली टरबूज-खरबूज अन् शेकड्यांनी खाल्लेले आंबे यांची चव अजुनही जीभेवर रेंगाळत आहे. या वास्तुतलाही तुमची आठवण नेहमीच येत राहील
बापूंच्या वास्तुत राहणारा लाडका मुलगा
..... सुनील
वास्तु म्हणे तथास्तु
9 December 1975 to 9 December 2025 50 years
No comments:
Post a Comment