Saturday, July 11, 2026

सारे सोपविले हरीवरी

जागेपणी झोपलो
झोपेतही जागलो  

ब्रह्मानंदी टाळी लागली आत्मानंदी टाळी लागली

उठता बैसता आळविला श्री हरी
स्वप्नातही दिसे तो श्री हरी 

हरी संगे नित्य रमावे त्यासी मग नित्य भजावे 

नित्यनेमे त्यासी जपावे
नियमामध्ये खंड पडलासे 

ते मी सारे सोपविले हरीवरी 
हरीच करतो आता माझ्यासाठी जप

विश्रांती

अपघातानंतर देहाला मिळाली ती विश्रांती
मनास मात्र क्षणभर नाही ती विश्रांती

इकडून तिकडे विहरे याची त्याची भ्रांती
येई त्यासी मग परब्रह्माची प्रचिती

शब्दामागूनी शब्द सुचती ते आपोआप 
रचना होईल मग नवी ती ही आपोआप

विचारांच्या ओघांना नाही कसले बंधन
वाहती वाहती ते सर्वत्र बेधुंद

जरी घातले त्यांसी शब्दांचे  मग बांध
उसळुनी वाहती फोडून मग ते बांध 

अंथरूणास लावली ती पाठ
डोळे छतासी लागले उघडे सताड

मग दिसू लागते ते छतापल्याडचे ब्रह्मांड
डोळ्यामध्ये मावेना ते अखिल ब्रह्मांड

देह मनाची जाणीव नेणीव हरपता
कळेना मी कोठे ब्रह्मांडी की खाटेवरती

अंतरीची ज्योत

माझ्या अंतरंगात तेवत होती एक दिव्याची ज्योत
मंद मंद सगळीकडे पसरला होता प्रकाश

कधी कधी होत होती दिसेनासी ज्योत
अंतरंगातला अंधकार दाटला होता चौफेर

बाह्य आवकाशात होता पसरला प्रकाश
त्या प्रकाशात मग मंदमंद तेवत होती ज्योत

बाह्य आवकाशात जेव्हा पडेल गडद अंधार 
तेव्हाच तेवेल खरी अंतरंगातली ज्योत प्रखर

जसे घराबाहेर येता अंधारून प्रकाशते घर
तसेच बाह्य मनात येता अंधारून प्रकाशात अंतरीची ज्योत

कधी कुणी ऐकला आहे स्वतःच्या हृदयाचा आवाज

कधी कुणी ऐकला आहे स्वतःच्या हृदयाचा आवाज 
पाहिले आहे का रक्तवाहीन्यात खळखळणारे रक्त 

दुसऱ्याच्या हृदयाचे ऐकताना ठोके
चुकलेत का कधी तुमच्या हृदयाचे ठोके 

अंतरंगात नेहमी इतरांच्या डोकावताना 
स्वअंतरंगात डोकावलात का हो कधी

पहा कधी ऐकून आपल्या हृदयाची धडधड
ऐका कधी वाहणाऱ्या रक्ताची रक्ताची खळखळ

विसरायला होईल सारे काही बाह्य ब्रह्मांड
अंतरंगात दिसून येईल विशाल ब्रह्मांड

माऊली म्हणती हरी पाहिला रे हरी पाहिला रे
सबाह्याभ्यंतरी अवघा व्यापक मुरारी

दिसेल मग तुम्हा जळी स्थळी हरी
प्रगटेल आत्माराम तुमच्या अंतरंगी

दुःख

दुःख या गोष्टीचं नाहीये की मी पडलो
दुःख या गोष्टीचं आहे की का पडलो 

मला असह्य वेदना होताहेत शारिरीक
पण त्याहून अधिक मानसिक वेदना होताहेत

माझ्या पाऊलांवर मला दोन पावलं चालता येत नाही
धड दोन पायांवर आधाराशिवाय उभं राहता येत नाही

माझे दुःख मलाच सहन करायचे आहे
पण त्यामुळे इतरांना दुःख सहन करावे लागत आहे 

माझ्या सेवेसाठी अपला अमूल्य वेळ घालवावा लागतो आहे 
इतरांच्या सेवेसाठीचा माझा वेळ मात्र वाया जातो आहे 

दुःख या गोष्टीचं नाहीये मला कोणाची सेवा करावी लागते 
दुःख या गोष्टीचं आहे माझी सेवा दुसऱ्या कोणाला करावी लागत आहे .

दिनानाथा करी मजवर कृपा

नीजआकाशी गेला जो हा देह
निमीर्षाधात आला धरेवर तो देह

स्वतःस म्हणविला मीच माझा करताकरविता
त्या देहाचा साक्षेप मग सहजी निमाला 

वेदेनेचा कलौळ साऱ्या देहासी जाहला 
उठता बैसता निजता तो देहासी जाहला

आता हा वेदनेचा कलौळ देहातीत जाहला
मी तू पणाची नेणिव क्षणी निमाली

आता वेदेनेसी त्रयस्थपणे आपण पाहवे
साहणे न साहणे ते देहातीत व्हावे

आता तुच द्यावी इतुकी दिनानाथा पीडा
जी तुजलागी होईल सहन तितुकीच पीडा 

तुझे माझे न आता उरले काही
एकाएकी ते एकरूप जाहले देहात्म्याचे

माझी पीडा तुझी जाहली साहली जर तुजला तु सहावी

सुनील म्हणे दिनानाथा करी मजवर कृपा
विसर न पडू द्यावा तव चरणरजांचा

पानावरचे कोरलेले लिखित

आयुष्यातील प्रत्येक पानावर कोरलेली असते एक न पुसणारी रेषा कितीही घासली तरी न मिटणारी

पानांमागून उलटता पाने दिसातात आपल्याला कोरी
मनासारखे घडतां मला वाटते मीच केले कोऱ्यावर काळे

पण जेव्हा घडते सारे विपरीतच 
तेव्हा कळते पानावरचे कोरलेले लिखित

मी आणि माझे मग सारेच वाटू लागते व्यर्थ
यत्न सारे आपले मग न ठरतात सार्थ
…सुनील