Thursday, July 31, 2025

पैसा

कोणी तरी म्हणालं की, घरात कायम ५ हजार रुपये पाहिजे केव्हा गरज लागेल सांगता येत नाही. खरच गरजेला पैसा कामाला येतो. पण तो किती पुरेसा आहे ह्याच मापदंड कसं ठरवणार. 


खरचं गरजेला पैशाचा उपयोग होतो? एखाद्याकडे घरात पाचपन्नास हजार रुपये कपाटात पडून असतील तर त्याचा जीव खरचं वाचू शकतो का? फक्त एक कार्डिआक ॲटॅक सर्व खेळ खलास. ते पाच पन्नास हजार कपाटात तसेच पडून राहतात. काही लोकांच्या नशिबात व्हिल चेअरवर, अंथरूणास खिळून राहण्याची वेळ येते. पैसा आहे म्हणून त्याला बरं होता येत नाही. पैशामुळे त्याच्या दिमतीला सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन-तीन माणसं पगारी ठेवतां येतील. पण, त्या माणसाला धड बोलताही येत नाही अन् जीव जात नाही म्हणून मरताही येत नाही. मग मला सांगा कितीही पैसा असला तरी उपयोग काय?


खरचं पैसा हा लागतोच  पण, किती? हा ज्याचा त्याच प्रश्र्न कारण, तो कितीही असला तरी कमीच पडतो आणि नसला तरी काही फरक पडत नाही. पैसा असला तरी जीव काही वाचत नाही अन् नसला तरी जात नाही.


कालच मंडई जवळ एक प्रेत बघितलं. अगदी मुन्नाभाई MBBS मधल्या डिसेश्कनला घेतलेल्या प्रेतासारखं. हाडांची काडं झालेली. कित्येक दिवस उपाशी राहील्याने पोट खपाटीला गेलेलं. कित्येक महिने अंगाला पाणी न लागलेल. रापलेलं शरिर. केस, दाढी अस्ताव्यस्त वाढलेलं.डोळे आकाशाकडे लागलेले सताड उघडे. असं बेवारस भयानक मरण माणसाच्या वाट्याला का यावं? याचं उत्तर न माझ्या-तुमच्याकडे, ना त्या विधात्याकडे.


मग प्रश्र्न असा पडतो की जगण्यापूरता का होईना थोडा पैसा माझ्याकडे आहे. पण, ज्याला रोजच्या एकावेळच्या जेवणाची भ्रांत आहे त्यानं काय करावे? त्याला आपण का जगतो हा प्रश्र्न नेहमीच पडावां आणि आपल्याकडे असणाऱ्या कमतरतेवर खंत करावी. पण असे फुटपाथवर भिक मागत जगणारे असंख्य जीव बघितले की जीव तुटतो. अशा लोकांसाठी आपण काही करू शकत नाही तर आपल्याला काय अधिकार आहे असलेला पैसा उधळायचा. निदान मला इतरांसाठी काही करता आलं नाही तरी रोजचा घास खाताना क्षणभर तरी माझा घास अडला तरी खूप. मी कोणाचं पोट भरावं इतका मोठा नक्कीच नाही. पण जगात असंख्य जीव उपाशी असताना मला रोज मिळणाऱ्या घासाची मला किंमत कळावी इतकेच. मी कोणाचं कायमचं पोट भरू शकलो नाही तरी कधी कुणा भुकेल्याला चार घास खाऊ घालू शकलो तरी माझी त्या इश्वरचरणी थोडी सेवा होईल. शेवटचा श्र्वास घेताना त्या विधात्याचा नजरेला नजर देण्याची हिंम्मत होईल. मी लिहिलेल्या अनेक माणूसकीच्या कविता ‘माणूसकीने’ जगल्याचं थोड समाधान मिळेल इतकचं.


....सुनील

No comments:

Post a Comment